चीनी  लस घेतल्यावर पाक पंतप्रधान इम्रान खान करोना पॉझिटिव्ह

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बेगम हे दोघेही करोना संक्रमित झाले असून शनिवारी त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. हे दोघेही त्यांच्या निवासस्थानी विलगीकरणात आहेत अशी माहिती पाकिस्तानचे आरोग्य मंत्री फैसल सुलतान यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही माहिती वाचल्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान याना लवकर बरे व्हा अश्या शुभेच्छा दिल्या आहेत.

इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशेरा यांनी १८ मार्च रोजी चीनी कोविड १९ लस सिनोफार्मचा पहिला डोस घेतला होता. पाकिस्तान मध्ये सध्या कोविड १९ साठी फक्त हीच लस उपलब्ध असून चीनने या लसीचे ५ लाख डोस पाकिस्तानला डोनेट केले आहेत. भारताच्या कोवीशिल्डचे साडेचार कोटी डोस पाकिस्तानला दिले जाणार आहेत.

दरम्यान वल्डोमीटर डॉट इन्फो स्लॅश करोना व्हायरसच्या आकडेवारीनुसार जगभरात करोना रुग्णांची एकूण संख्या १२.२८ कोटींवर वर गेली असून गेल्या चोवीस तासात ५.०५ लाख नवे रुग्ण आढळले आहेत आणि ९ हजार मृत्यू झाले आहेत. जगात करोनाने आत्तापर्यंत २७ लाख १२ हजाराहून अधिक बळी घेतले आहेत. सर्वाधिक बळी अमेरिकेत गेले असून ही संख्या ५,५४,१०४ इतकी आहे. त्याखालोखाल ब्राझील २,९०,५२५ आणि भारत १,५९,५९४ मृत्यू असे क्रमांक आहेत.