ऑस्ट्रेलियात भयानक पूर, लाखो नागरिकांचे स्थलांतर

ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या न्यू साऊथवेल्स राज्याला भयंकर पुराचा तडाखा बसला आहे. प्रचंड पावसामुळे पूरस्थिती आणखी बिघडत चालली असल्याने लाखो नागरिकांना घरे सोडून अन्यत्र आसरा घ्यावा लागला आहे. पुढचे काही दिवस पाऊस असाच कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. प्रशासन, पोलिसांनी पूरग्रस्तांसाठी मदतकार्य सुरु केले असून शेकडो लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले गेले आहे. या राज्याची लोकसंख्या ८० लाखाच्या घरात आहे.

२०२० मध्ये जंगल वणव्यांमुळे प्रचंड नुकसान झाले असताना आता पुरामुळे पुन्हा एकदा मोठे नुकसान झाल्याचे प्रशासन अधिकारी सांगत आहेत. १०० वर्षात प्रथमच इतका प्रचंड पूर आल्याचेही सांगितले जात असून तळ भागात राहणाऱ्या लोकांना त्वरित हलविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. सिडनेच्या काही भागात पुराचे पाणी आले आहे. नागरिकांनी पूर भागात जाऊ नये असे आवाहन केले जात आहे.

सिडने शहराला पाणी पुरवठा करणारे बार्गाम्बा धरणाची पाणी पातळी रेकॉर्ड स्तरावर गेली आहे. २०१६ नंतर प्रथमच हे धरण भरून वाहू लागले आहे. गुरुवारपर्यंत पावसापासून काहीही दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याने पूर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.