परमबीर सिंह यांचे आरोप दुर्दैवी, महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करावे


नाशिक : देशभरात मुंबईचे माजी पोलिस महासंचालक परमबीर सिंह यांच्या पत्राची सध्या राज्यासह जोरदार चर्चा आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत नाशिकमध्ये बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात नक्कीच हा चर्चेचा विषय आहे. नक्कीच सनसनाटी आणि खळबळजनक पत्र आहे. लोक म्हणतात हा लेटर बॉम्ब पण यात सत्यता किती आहे हे मुख्यमंत्री आणि पवार साहेब तपासून बघतील. स्वतः अनिल देशमुख यांनी या प्रकरणी पत्राच्या चौकशीची मागणी केली आहे. पण प्रत्येकाने नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अशा प्रकारचे आरोप होत असून ते दुर्दैवी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, हे सरकार यावे म्हणून ज्यांनी खारीचा वाटा उचलला अशा आमच्या सारख्यांसाठी हे धक्कादायक आहे. महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. सरकारला दीड वर्ष झाले, पण आता आपले पाय प्रत्येकाने तपासले पाहिजे, आपले पाय नक्की जमिनीवर आहेत का? माझी यात वैयक्तिक भूमिका नाही. पण पोलीस प्रशासन हा कोणत्याही सरकारचा कणा असल्याचे ते म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, आमची राजवट देखील उत्तम चालली आहे, पण काही तरी दुरुस्त करावे लागेल. हे आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त असून त्यांना एका प्रकरणात पदावरून जावे लागले आहे. त्यांच्या कामाबाबद्दल कौतुक आहे पण त्यांच्या पत्रावर तपास करावा, असे स्वतः गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. पवार साहेब योग्य भूमिका आणि निर्णय घेण्यासाठी भूमिका पार पाडतील, आज पवार साहेबांशी मी दिल्लीत भेटेन, असेही संजय राऊत म्हणाले.

विरोधी पक्षाने मागणी केली म्हणून सरकार चालत नाही. 72 तासात सरकारवर शिंतोडे उडाले हे मान्य करण्याचा मोठेपणा माझ्याकडे आहे. यातून कसे धुवून काढायचे यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यानी सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. योग्य वेळी काही गोष्टींवर निर्णय घेणे अपेक्षित होते, पण सत्तेपुढे शहाणपण नसल्याचेही ते म्हणाले.