आता कोविन अॅपला विसरा आणि थेट केंद्रावर जाऊन घ्या कोरोना लस


मुंबई – मुंबईकरांना आता थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेता येणार असून कोविन अॅपवर येणाऱ्या मेसेजची वाट पाहत राहावी लागणार नाही. आपण नोंदणी केलेली नसली तरी आवश्यक प्रक्रिया लसीकरण केंद्रावर पार पाडून लस दिली जाणार आहे. ही लस शासकीय, पालिका आणि खासगी अशा एकूण 59 केंद्रांवर घेता येणार आहे.

16 जानेवारीपासून देशात लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाइन वर्कर आणि 45 ते 59 वयोगटातील सहव्याधी असणारे आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठांचे लसीकरण सुरू आहे. यामध्ये लाभार्थ्यांना लसीकरणासाठी कोविन अॅपमध्ये नोंदणी करणे अनिवार्य होते. नोंदणी केल्यानंतर मेसेज आल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडली जात होती. पण कोविन अॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणाला फटका बसत होता. त्यामुळे थेट लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये कोविन अॅपवर नोंदणी केल्यानंतर थेट लसीकरणासाठी जावे किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणीची व्यवस्था असेल. यामध्ये शासकीय आणि पालिकेच्या लसीकरण केंद्रावर मोफत तर खासगी केंद्रांवर 250 रुपयांत लस दिली जात आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत दररोज 1 लाख लसीकरण करण्यासाठी पालिकेने आणखी 29 खासगी सेंटर्ससाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे.