मुळात हे खाद्यपदार्थ भारतीय नाहीच


भारत आणि भारतातील निरनिराळे प्रांत म्हणजे निरनिराळ्या खाद्यसंस्कृतींचा मनोहर मिलाप. या सर्व खाद्यसंस्कृतींची वैशिष्ट्ये असणारे अनेक पदार्थ भारतभर कीर्ती मिळवून आहेत. हे पदार्थ सगळीकडे बनविले जातात, चवीने खाल्ले जातात, आणि त्यांना मनापासून दादही दिली जाते. प्रत्येक पदार्थाची काही खासियत आहे. ते बनविण्याची पद्धत, त्यामध्ये वापरले जाणारे साहित्य, यामुळे ते पदार्थ ‘ खास ‘ बनतात. पण आपल्या खाद्यसंस्कृतीतील काही पदार्थ मूळचे भारतीय नसून, ते भारताबाहेरून आलेले आहेत. व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या व्यापाऱ्यांच्या, तर कधी भारतावर स्वारी करण्यासाठी आलेल्या राज्यकर्त्यांच्या सोबत हे पदार्थ भारतामध्ये आले, आणि इथलेच होऊन राहिले.

सामोसा हा लोकप्रिय पदार्थ मूळचा मध्यपूर्वेतील देशांमधला. या ठिकाणी याला ‘ सम्बोसा ‘ म्हटले जात असे. दहाव्या शतकाच्या आधीपासून हा पदार्थ तेथील प्रांतांमध्ये अस्तित्वात होता. १३व्या शतकामध्ये मध्य आशियातील व्यापारी, व्यापाराच्या निमित्ताने जेव्हा भारतामध्ये आले, तेव्हाच सामोसा देखील त्यांच्याबरोबर भारतामध्ये आला.

‘ बिर्याणी ‘ हा अतिशय लोकप्रिय पदार्थ मूळचा पर्शियन असून, मुघल राज्यकर्त्यांबरोबर हा पदार्थ भारतामध्ये आला. तर काहींच्या मते, मुघल शासक भारतामध्ये येण्याआधीपासूनच बिर्याणी बनविण्याची पद्धत भारतामध्ये अस्तित्वात होती. ‘ गुलाब जाम’ हा सर्वाच्या पसंतीचा गोड पदार्थ देखील मूळचा भारतीय नाही. काहींच्या मते हा पदार्थ तुर्कस्तानातून आला आहे, तर काहींच्या मते मुघल सम्राट शाहजहानच्या आचाऱ्याने अगदी अनपेक्षितपणे या पदार्थाचा शोध लावला. काही इतिहासकारांच्या मते गुलाबजाम एका पर्शियन खाद्यपदार्थाचे बदललेले रूप आहे.

आपल्या सर्वांचा दिवस ज्याच्या शिवाय सुरु होत नाही, तो चहा देखील भारतीय नाही. चहा हा चीन मधून भारतामध्ये आणला गेला. जेव्हा ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये पाय रोवण्यास सुरुवात केली, तेव्हा चहाची मोठ्या प्रमाणावर निर्यात करणारा चीन त्यांना नकोसा झाला. त्यामुळे त्यांनी भारतामध्येच चहाच्या बागा तयार करण्यास सुरुवात केली, आणि अश्या तऱ्हेने चहा भारतामध्ये तयार होऊ लागला.

Leave a Comment