नवी दिल्ली – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने(AICTE) काही दिवसांपूर्वीच इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे धोरण जाहीर केले. यानुसार गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे तीन विषय बारावीच्या विद्यार्थ्याने घेतले नसतील तरीही त्याला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेता येणार आहे. पण नीती आयोगाचे सदस्य आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ व्ही. के. सारस्वत यांनी या निर्णयावरुन टीका केली आहे. सारस्वत हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी प्रमुख होते.
इंजिनिअरिंगसाठी गणित आणि भौतिकशास्त्र विषय बंधनकारक न ठेवण्याचा निर्णय धोकादायक
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र विषय बंधनकारक न ठेवण्याचा निर्णय धोकादायक असल्याचे सारस्वत म्हणाले. तसेच, यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी शुक्रवारी दिला. गणित आणि फिजिक्स हे दोन विषय कोणत्याही अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सारस्वत यांनी नमूद केले.
गणित आणि भौतिकशास्त्र यांचे ज्ञान बायोमेडिकल अभियांत्रिकी आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या अभियांत्रिकी शाखांनाही आवश्यक आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांसाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री विषय बंधनकारक नसणे हे धोकादायक ठरू शकते, कारण यामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे बेसिक शिक्षणच मिळणार नसल्याचे सारस्वत यांनी म्हटले आहे.
एआयसीटीईने गेल्या आठवड्यात पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता निकषांमध्ये बदल केला. गणित, भौतिकशास्त्र हे विषय अकरावी, बारावीच्या स्तरावर अभ्यासण्याचे बंधन शिथील करून तीन विज्ञान विषय घेऊन बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकी प्रवेशाची मुभा दिली. या निर्णयावर झालेल्या टीकेनंतर परिषदेने पात्रता निकष निश्चित करण्याची जबाबदारी राज्यांवर किंवा विद्यापीठांवर सोपवली.
पण, नियम पूर्णपणे मागे घेतला नसल्यामुळे राज्यांनी स्विकारल्यास बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीला प्रवेश मिळू शकतो. आता १४ विषयांची यादी AICTE संस्थेने जाहीर केली असून इंजिनिअरिंगमध्ये प्रवेशासाठी यादीतील १४ पैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के मार्कांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता या विषयांचा समावेश असेल. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी AICTE ने एक हँडबुक जारी केले असून त्यातही याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.