कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘रेमडेसिवीर’च्या किंमतीत कपात


मुंबई : राज्यात कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण पुन्हा वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेत अन्न व औषध विभागाने कोरोनावर गुणकारी ठरणाऱ्या ‘रेमडेसिवीर’च्या किमती कमी केल्या आहेत. 4500 ते 5400 रुपयांना मिळणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आता 1200 ते 1800 रुपयांना राज्यातील बहुतेक खासगी रुग्णालयांत उपलब्ध होणार आहे. ‘एफडीए’च्या ‘विनंती’बाबत मुंबईतील रुग्णालये अजूनही आडमुठे धोरण अवलंबत असली तरी लवकरच तेही रुग्णहिताचा विचार करून किंमती कमी करतील, असा विश्वास ‘एफडीए’चे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला.

कोरोनाचा कहर राज्यातही पाहायला मिळत आहे. कोरोनाचा धोका जरी वाढत असला, तरी लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहेत. लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना लोक खुलेआम फिरताना दिसत आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ झाली आहे. तर 70 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे 25 हजारांहून अधिक रूग्ण वाढले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासांत आजपर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ झाली आहे.

दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ आणि नियमांचा फाटा देण्यात येण्यात येत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक इशारा दिला आहे. वेळप्रसंगी कडक लॉकडाऊन लावावे लागेल. कृपया नियमांचे पालन करा. मास्क वापरा, हात साबणाने स्वच्छ धुवा, असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे. राज्यातल्या सर्व खासगी ऑफिसेसमध्ये 50 टक्केच उपस्थिती ठेवावी, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशांमध्ये म्हटले आहे.