अॅपलमधील iOS 14 च्या प्रायव्हसी बदलावरुन फेसबुक आणि अॅपल आमने सामने


नवी दिल्ली – फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने अॅपलच्या iOS 14 मध्ये करण्यात येणाऱ्या प्रायव्हसी बदलाचा फायदा हा फेसबुकलाच होणार असून आम्ही या बाबतीत ‘चांगल्या स्थितीत’ असल्याचा दावा केला आहे. फेसबुक आणि अॅपलमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रायव्हसी पॉलिसीवरुन वाद रंगला आहे.

एका कार्यक्रमात अॅपलच्या iOS 14 मध्ये करण्यात येणाऱ्या प्रायव्हसी बदलाबाबत मार्क झुकरबर्गला विचारले असता, तो म्हणाला की, अॅपलने आपल्या iOS 14 मध्ये काही प्रायव्हसी बदल केले आहेत. त्याचा फायदा फेसबुकला होणार असल्यामुळे जगातील अनेक कंपन्या त्यांचा व्यापार आणि व्यवहार करण्यासाठी फेसबुकच्या प्लॅटफॉर्मचा वापर करतील. कारण या कंपन्यांना अॅपलच्या नव्या पॉलिसीमुळे त्यांच्या ग्राहकांचा डेटा शोधणे आणि त्याचा वापर करणे अवघड होणार आहे.

फेसबुक सध्या लहान व्यावसायिकांच्या व्यवहारावर लक्ष केंद्रीत करणे आणि त्यांच्या व्यवहारांना अपडेट्स करण्यावर काम करत असल्याचेही मार्क झुकरबर्गने सांगितले. गेल्या काही दिवसापासून फेसबुक आणि अॅपलचा वाद सुरु आहे. आपल्या युजर्सना त्यांच्या डेटावर अधिक नियंत्रण मिळावे, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या डेटाचा वापर कोणी करु नये आणि त्यामध्ये अधिक पारदर्शकता असावी, यासाठी अॅपलने त्याच्या iOS 14 मध्ये काही बदल केल्यामुळे फेसबुकला आता युजर्सच्या परवानगीशिवाय त्यांचा डेटा वापरता येणार नाही. त्यावरून अॅपलवर फेसबुकने टीका केली होती.

अॅपलने या आधी अनेकवेळा यूजर्सचा डेटा गोळा करुन त्याचा फायदा जाहिरातींसाठी करणाऱ्या फेसबुकवर टीका केली आहे. अॅपलने आपल्या यूजर्सच्या खासगी डेटाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून एक खास फिचर आणले आहे. याचा परिणाम थेट फेसबुकच्या महसुलावर होणार असल्याने फेसबुकने त्यावर नाराजी व्यक्त केली होती.

अॅपलने या आधी एक नवीन फिचर iOS 14 मार्केटमध्ये आणणार असल्याची घोषणा केली होती. या फिचरचा यूजर्सचा खासगी डेटा अधिक सुरक्षित रहावा हा उद्देश आहे. त्यानुसार फेसबुकबरोबरच इतर कोणत्याही अॅपला आता अॅपलमधील डेटा वापरण्यापूर्वी यूजर्सची परवानगी घ्यावी लागणार आहे. फेसबुक हे व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून अशा प्रकारे यूजर्सचा डेटाचा त्यांना न विचारता वापर करते, त्या डेटाच्या माध्यमातून यूजर्सवर जाहिरातींचा मारा करते आणि त्या माध्यमातून बक्कळ महसूल कमवते, असा आरोप फेसबुकवर नेहमीच होतो.

जाहिरातींवर अॅपलचा महसूल हा अवलंबून नाही. तो त्यांच्या अॅप स्टोअर आणि डिव्हाइस प्रोडक्टच्या माध्यमातून येतो. फेसबुकचा महसूल त्याच्या जाहिरातींवर अवलंबून असल्यामुळे या कंपनीकडून यूजर्सचा मोठ्या प्रमाणावर खासगी डेटा गोळा केला जातो. त्यावर अॅपलने अनेकदा आक्षेप घेतला आहे. फेसबुक आपल्या यूजर्सच्या गोपनियतेशी खेळत असल्याचे अॅपलने या आधीही आरोप केले आहेत.

केवळ आपल्या अॅपच्या माध्यमातून यूजर्सचा डेटा फेसबुक गोळा करत असते तर ठिक आहे, पण फेसबुक फोन, कॉम्यूटर्स, टीव्ही आणि इतर माध्यमातून डेटा गोळा करतो, यावर अॅपलचा आक्षेप आहे. तसेच फेसबुक आपल्या यूजर्सना विचारता, त्यांची परवानगी न घेता डेटा वापरते, असाही आरोप अॅपलने या आधी केला आहे. अॅपलच्या या नवीन फिचरवर फेसबुकने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे छोट्या व्यावसायिकांचे हित धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.

या विरुध्द अॅपलचे मत आहे. आपल्यासाठी आपल्या यूजर्सचा खासगी डेटा महत्वाचा आहे. वेगवेगळे अॅप आणि वेबसाइटवरुन त्यांचा खासगी डेटा कशा प्रकारे एकत्रित केला जातो आणि त्याचा वापर कशा पध्दतीने करण्यात येतो हे यूजर्सला माहित असायला हवे, असे अॅपलने स्पष्ट केले आहे. iOS 14 मधील नव्या ‘अॅप ट्रॅकिंग ट्रान्स्पेरंसी’ मुळे फेसबुकला आता यूजर्सना ट्रॅक करणे आणि टारगेटेड जाहिराती करणे सहज शक्य होणार नाही. तसे करायचे असेल तर फेसबुकला पहिल्यांदा यूजर्सची परवानगी घेणे आवश्यक आहे.