कोरोनाचा प्रकोप ! मुंबई महानगरपालिकेने सील केल्या ३०५ इमारती


मुंबई – मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येचा स्फोट झाल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेकडून आटोकाट प्रयत्न केले जात असतानाही मुंबईतील बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले असून, ३ हजार ६२ रुग्ण शनिवारी आढळून आल्यामुळे महापालिकेने मुंबईतील ३०५ इमारती सील केल्या आहेत.

कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे राज्यात मागील सहा दिवसांत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी १३ हजार ९१२ रुग्ण मुंबईतील आहेत. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. मुंबईत ७ ऑक्टोबर २०२० रोजी म्हणजे मागच्या वर्षी उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. एका दिवसातील २ हजार ८४८ एवढी रुग्णसंख्या होती. त्यानंतर पहिल्यांदाच हा आकडा तीन हजारांच्या पुढे गेला आहे.

महापालिकेकडून वाढता प्रसार रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन तयार केले जात आहे. त्याचबरोबर मॉल्स, थिएटरसह गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणीही चाचण्या करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर दुसरीकडे रुग्ण आढळून येणाऱ्या इमारती सील केल्या जात आहे. मागील सहा दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली. १३ मार्च रोजी मुंबईत ३१ कंटेनमेंट झोन होते. तर २२० इमारती सील करण्यात आल्या होत्या. १८ मार्च रोजी त्यात मोठी वाढ झाली. कंटेनमेंट झोन ३४ झाले असून, ३०५ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.