भाजप खासदार स्वामींची अमित शहा यांच्यावर टीका


नवी दिल्ली – भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी लढत पश्चिम बंगालमध्ये होताना दिसत आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये सर्वप्रथमच एवढे लक्ष घातले असून, बंगालमधील प्रचार मोहिमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारीक नजर ठेवून आहेत. भाजपने बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामाही प्रसिद्ध केला असून, भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या जाहीरनाम्यावरून अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.


भाजपने आठ टप्प्यात मतदान होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्वस्व पणाला लावले आहे. तर दुसरीकडे सत्ता राखण्यासाठी ममता बॅनर्जीही जीवाचे रान करताना दिसत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीकेचीही एकही संधी सोडत नसल्याचे चित्र असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी घरचा आहेर दिला आहे.

भाजपने बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. अमित शहा यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केल्याने स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचा बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रसिद्ध केला, हे आश्चर्यच आहे. यातून चुकीचा संदेश जाणार असून, यातून भाजपच्या निवडणूक मोहिमेला धक्का बसेल. पश्चिम बंगालच्या प्रदेशाध्यक्षांच्या हस्तेच जाहीरनामा प्रसिद्ध करायला हवा होता, असे स्वामी यांनी म्हटले आहे.