हे आहेत मुंबई पोलिसातील गाजलेले एनकौंटर स्पेशालिस्ट

फोटो साभार दैनिक भास्कर

सध्या सचिन वाझे प्रकरण खुपच चर्चेत आले असताना मुंबई पोलिसात एनकौंटर स्पेशालिस्ट म्हणून गाजलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांच्या विषयीच्या चर्चा जोर पकडू लागल्या आहेत. एनकौंटर स्पेशालिस्ट हा प्रकार प्रथम रुजला गेला तो १९८०-९० या दशकात. त्यावेळी मुंबईत अंडरवर्ल्डचा आतंक पराकोटीला पोहोचला होता आणि तेव्हा काही पोलीस अधिकाऱ्यांना छोटा राजन, दाऊद व अन्य गँगना संपविण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांना दिली गेली होती. या काळात ४५० एनकौंटर केले गेले होते.

या अधिकाऱ्यांना त्यासाठी अमर्याद अधिकार दिले गेले होते आणि शूट अॅट साईट असे आदेशही. या अधिकाऱ्यांनी अंडरवर्ल्ड गँग विरोधात इतकी जोमाने मोहीम चालविली की यातील अनेक अधिकाऱ्यांना अंडरवर्ल्ड मधील गुंड टरकून होते. अर्थात एनकौंटर स्पेशालिस्ट म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्यांना लोकप्रियता खूप मिळाली आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा केले गेले. काहीना काही काळ निलंबन सुद्धा झेलावे लागले तर काहींनी नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला.

या यादीत पाहिले नाव येते प्रदीप शर्मा यांचे. त्यांच्या नावावर ११२ जणांचे एनकौंटर केल्याची नोंद असून १९८३ मध्ये ते पोलीस सेवेत आले होते.९० च्या दशकात गुन्हा अन्वेषण विभागात त्यांची बदली झाली आणि एनकौंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ख्याती झाली. अंडरवर्ल्ड मध्ये त्यांचे मजबूत नेटवर्क होते. त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई केली गेली होती. नोकरीतून मुक्त झाल्यावर ते शिवसेनेत गेले होते.

दया नायक हे असे दुसरे प्रसिद्ध नाव. त्यांच्यावर तर अनेक चित्रपट सुद्धा आले. १९९५ मध्ये त्यांनी अंडरवर्ल्ड एनकौंटर मध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडली. आता ते एटीएस मध्ये आहेत. त्यांच्यावर सुद्धा कमाई पेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप होता आणि त्यांना ६ वर्षे निलंबित केले गेले होते. छोटा राजनला छोटा शकीलच्या मदतीने संपविल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. नायक यांनी ८३ एनकौंटर केल्याची नोंद आहे.

प्रफुल्ल भोसले हेही एनकौंटर स्पेशालिस्ट असून त्यांच्या नावावर ७७ एनकौंटर केल्याची नोंद आहे तर आता मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात एटीएसच्या ताब्यात असलेले सचिन वाझे यांनी ६३ जणांना यमसदनी पाठविले आहे. रविंद्र भांगे हे त्यांच्या अंडरवर्ल्ड मधील मजबूत नेटवर्क बद्दल प्रसिद्ध असून त्यांनी ५४ एनकौंटर केली आहेत. सुरेश मंचेकर टोळीचा खात्मा केल्यामुळे ते चर्चेत आले. त्यांनी नोकरी सोडून भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

शेवटी राज्याच्या जनतेच्या नेहमीच स्मरणात राहिलेले अधिकारी आहेत दिवंगत विजय साळस्कर. अरुण गवळी टोळीचा सफाया त्यांनी केलाच पण अमर नाईक, सदा पावले याना अटक केल्यामुळेही ते चर्चेत आले होते. त्यानीही  ६१ एनकौंटर केली. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यात दहशदवाद्यांचा मुकाबला करताना ते शहीद झाले.