विमानात चढताना तीन वेळा घसरले राष्ट्राध्यक्ष बायडेन

फोटो साभार टेलिग्राफ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन एअरफोर्स विमानात चढत असताना तीन वेळा विमानाच्या शिडीवरून पडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. यामुळे जो बायडेन यांच्या तब्येतीबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. बायडेन ७८ वर्षांचे आहेत.

अर्थात विमानाची शिडी चढताना बायडेन यांचा तीन वेळा तोल गेल्याचे व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसत आहे. पैकी दोन वेळा त्यांनी हाताचा आधार घेऊन तोल सांभाळला तर तिसऱ्या वेळी गुडघ्याचा आधार घेऊन ते सावरल्याचे दिसत आहे. शेवटी शिडीचे रेलिंग पकडून ते विमानात चढले. या घटनेबाबत व्हाईट हाउस प्रेस सचिव कॅरिन पियेरे यांनी मात्र राष्ट्राध्यक्षांची तब्येत अगदी उत्तम असून ते फिट असल्याचे म्हटले आहे. बायडेन शिडीवरून चढत होते तेव्हा वाऱ्याचा वेग प्रचंड होता आणि त्यामुळे त्यांचे पाउल शिडीवर योग्य प्रकारे न पडल्याने ही घटना घडली असा खुलासाही करण्यात आला आहे.