डीटल इझी प्लस- स्वस्त इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात दाखल

भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीची मागणी वेगाने वाढत चालली आहे. अश्यावेळी डीटल कंपनीने त्यांची जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक दुचाकी ‘डीटल इझी प्लस’ नावाने बाजारात लाँच केली आहे. तिचे बुकिंग सुरु झाले असून फक्त १९९९ रुपये भरून कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंग करता येणार आहे. ‘डीटल डीकर्बोनिज इंडिया’ या मोहिमेखाली ही दुचाकी सादर केली गेली आहे.

जगातील सर्वात स्वस्त फिचर फोन २९९ रुपयात आणि एलईडी टीव्ही ३९९९ रुपयात उपलब्ध करून डीटल कंपनी चर्चेत आली आहे. इझी प्लस दुचाकीला २५० वॉटची इलेक्ट्रिक मोटर दिली गेली असून २० एमएएचची लिथियम आयन बॅटरी दिली गेली आहे. फुलचार्ज होण्यासाठी तिला ४ ते ५ तास लागतात आणि एका चार्ज मध्ये ६० किमी अंतर जाता येते.

कंपनीचे संस्थापक डॉ. योगेश भाटिया म्हणाले, भारतीय रस्त्यांचा विचार करून या दुचाकीचे डिझाईन केले गेले आहे. बीटूसी ई बाईक तयार करताना आधुनिक तंत्राचा वापर केला गेला आहे. या दुचाकीचा ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा वापरायला ती अतिशय उपयुक्त आहे. ग्राहकाला रोजच्या गरजेच्या वापरासाठी ही दुचाकी खात्रीची आणि समाधान देणारी असून या दुचाकीची किंमत आहे ३९९९९ रुपये.