चंद्रावर पहिले घर बांधायचेय? मग जमवा ३६० कोटी

फोटो साभार युट्यूब

चंद्रावर जाणे, तेथेच घर बांधून निवांत राहणे हे अनेकांचे स्वप्न असेल आणि आता हे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ फार दूर नाही. चंद्र यात्रा आणि चंद्रावर जमीन खरेदीच्या बातम्या सतत येत आहेत. मग जमीन खरेदी केल्यावर तेथे घर बांधून राहण्याचा विचार आलाच. अमेरिकेतील ‘मनी’ नावाच्या क्रेडीट कार्ड ब्रोकर फर्मने चंद्रावर घर बांधायला किती खर्च येईल याचा अंदाज दिला आहे. ही फर्म ग्राहकांना त्यांच्या पसंतीची उत्पादने खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा करते.

अमेरिकन अंतराळ संस्था नासा २०२४ मध्ये आर्टेमिस मिशन राबवीत असून त्यात चंद्रावरील बांधकाम योग्य जमीन पाहिली जाणार आहे. मनी फर्मच्या अंदाजानुसार चंद्रावर सर्वप्रथम घर बांधणाऱ्याला साधारण ३६० कोटी रुपये खर्च करावे लागतील. त्यात चंद्रापर्यंत प्रवास, साधन सामुग्री, मजूर, कच्चा माल नेणे हा खर्च आहे. दुसरे घर बांधणाऱ्याला ३०० कोटी खर्च येईल. त्यानंतर हळू हळू हा खर्च कमी होईल कारण तो पर्यंत चंद्रावर मजूर उपलब्ध असतील. त्यांच्या प्रवासाचा खर्च करावा लागणार नाही.

चंद्रावर वीज निर्माण करण्यासाठी छोटे अणुकेंद्र उभारले तर त्यासाठी १.३ अब्ज डॉलर्स खर्च येईल पण हेच काम ३४ सौर पॅनल लावले तर एका घरासाठी वीज निर्माण होऊ शकेल. याचा खर्च २३६१६ डॉलर्स असेल असाही अंदाज मनी ने दिला आहे.