वेगाने लोकप्रिय झालेले आणि रसना तृप्त करणारे पिझा, बर्गर, चिप्स सारखे फास्टफूड जगभरात प्रचंड प्रमाणात विकले जात असले तरी ते आरोग्यासाठी हानिकारक आहे याची जाणीव अनेक अहवाल देत असतात. मात्र साधारण तीस वर्षापूर्वी विकले जाणारे असे पदार्थ त्यामानाने कमी हानिकारक होते आणि गेल्या तीस वर्षात ते अधिक हानिकारक होत गेल्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी १९८६ ते २०१६ या काळात फास्टफूड चा दर्जा कसा घसरत गेला यावर संशोधन करून हा अहवाल सादर केला आहे.
असे घातक होत चाललेय फास्टफूड
या साठी त्यांनी प्रसिद्ध फास्टफूड चेनमधील पदार्थाची तुलना केली. बर्गर, बरितो व तत्सम पदार्थात मिठाचे प्रमाण खूपच वाढले असल्याचे आणि तरीही या पदार्थांचा खप वाढत असल्याचे निरीक्षण त्यात नोंदविले गेले. पदार्थाचे आकारमान वाढले आहे आणि त्यामुळे कॅलरी काउंटही वाढतो आहे असेही दिसून आले आहे. अनेक पदार्थांची गोडी वाढविली गेली आहे त्यामुळे गेल्या १० वर्षात या पदार्थातील कॅलरी कौंट ६२ टक्क्यांनी वाढला आहे तर पदार्थांचे वजन २४ टक्के वाढले आहे.
फ्रेंच फ्राईज, चिप्स अश्या साईडडिश मध्येही मिठाचे प्रमाण १०० टक्के वाढले आहे. त्यामुळे रोजच्या गरजेच्या १० टक्के अधिक मीठ पोटात जात आहे. परिणामी स्थूलता, हृदय विकार, किडनी विकार वाढत आहेत. भारतात अमेरिकेच्या तुलनेत फास्ट फूड पदार्थांचा आकार लहान आहे तरीही भरतत २००६ ते २०१६ या दहा वर्षात स्थूल लोकांची संख्या दुप्पटीने वाढली असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे.