अयोध्या राममंदिरासाठी लंकेच्या सीता वाटिकेतून येणार शिळा

अयोध्येत राममंदिर भूमिपूजन पार पडून आता प्रत्यक्ष बांधकाम सुरु होत असताना श्रीलंकेतील अशोक वाटिका म्हणजे सीता वाटिकेमधील एक शिळा आणली जात आहे. रामाच्या जन्मस्थळी उभारल्या जात असलेल्या या मंदिरात ही शिळा वापरली जाणार आहे. या मंदिरात श्रीरामाबरोबर सीतामाईला सुद्धा खास स्थान दिले जाणार आहे. श्रीलंकेचे भारतातील राजदूत मिलिंदा मारागोदर यांच्या कडे ही शिळा सोपविली गेली आहे.

श्रीलंकेतील अशोक वाटिकेत रावणाने अपहरण करून आणलेल्या सीताला ठेवले होते. हा भाग आज सीता एलिया नावाने ओळखला जातो. येथे सीतेचे एक मंदिर सुद्धा आहे. सीता अम्मान कोविले नावाने ते प्रसिध्द आहे. या भागात आजही अशोकाची असंख्य झाडे आहेत. या वाटिकेमधून एक नदी वाहते तिचे नाव सीता आहे. या नदीचे वैशिष्ट म्हणजे तिच्या दोन्ही तीरावरील मातीचा रंग वेगवेगळा आहे. वाटिकेच्या बाजूची माती पिवळी तर दुसऱ्या तीरावरची काळी आहे.

या बाबत असे सांगितले जाते की हनुमानाने लंका जाळली तेव्हा नदीच्या दुसऱ्या तीरावरची माती पण जाळली गेली आणि ती काळी पडली. अशोक वाटिकेत सीतामाई होती त्यामुळे त्या भागाला हनुमानाने आग लावली नाही. त्यामुळे नदीच्या या बाजूच्या तीरावरची माती पिवळी राहिली.