अजब नेकलेस, किंमत २ हजार डॉलर्स

फॅशनच्या दुनियेत कोणती वस्तू कधी ट्रेंड करेल हे सांगणे ब्रह्मदेवाला सुद्धा शक्य होणार नाही. कपडे असोत, पर्सेस असोत, पादत्राणे असोत, मेकअप सामान असो किंवा दागदागिने असोत. त्यातून सोशल मिडियामुळे विचित्र फॅशन्स सुद्धा वेगाने जगभर पोहोचतात आणि चर्चेत येतात.

आता असाच एक अनोखा दागिना चर्चेत आला असून तो एक नेकलेस आहे. इटलीच्या प्रसिद्ध लग्झरी फॅशन हाउस बोटेगा वेनेटाने हा नेकलेस आणि त्याच्या सोबत इअरिंग आणि अंगठी असा सेट सादर केला आहे. जी जनता लँडलाईन फोन सर्रास वापरत होते त्या काळात लहानाची मोठी झाली आहे त्यांना हे दागिने पाहून त्या काळाची आठवण येणे अपरिहार्य आहे.

हा नेकलेस चक्क फोनच्या त्या काळातील वायरसारखा आहे. शेजारी शेजारी ठेवले तर लँडलाईन फोनची ती विळखेदार वायर कुठली आणि नेकलेस कुठला हे सांगणे अवघड आहे. फोनची वायर बाजारात ५ डॉलर्स मध्ये मिळत असली तरी या नेकलेस ची किंमत आहे दोन हजार डॉलर्स. म्हणजे भारतीय रुपयात चक्क १,४४,९०० रुपये. स्टर्लिंग चांदीच्या मदतीने हा नेकलेस बनविला गेला आहे.पांढरा, निळा आणि लव्हेंडर रंगात हे दागिने उपलब्ध आहेत.

डाईट प्राडा नावाच्या इन्स्टाग्राम अकौंटवर याचे फोटो शेअर केले गेले असून त्याला १.२५ लाख लाईक आणि २८०० कॉमेंट मिळाल्या आहेत. या नेकलेसला मॅचिंग इअरिंगची किंमत ८०० डॉलर्स तर अंगठीची किंमत ४८० डॉलर्स आहे. हा नवा दागिना सेट देशविदेशात चांगलाच चर्चेत आला आहे.