“मोदींविरुद्ध बोलणे म्हणजे भारतमातेविरुद्ध बोलणे”


कोलकाता – पश्चिम बंगालमधील विधानसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी रंगात येऊ लागली आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांच्यात टीका आणि आरोपांचे घमासान सुरू असून, मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत आहेत. पूर्व मदिनापूर येथे झालेल्या रॅलीत ममतांनी मोदींचे तोंड बघायचे नाही, अशी टीका केली. त्यावर मोदींविरुद्ध बोलणे म्हणजे भारतमातेविरुद्ध बोलणे, असे म्हणत भाजप नेत्याने ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर दिले आहे.

ममता बॅनर्जी यांनी आज पूर्व मदिनापूर येथे झालेल्या प्रचारसभेत आम्हाला पंतप्रधान मोदींचे तोंडही बघायचे नसल्याचे म्हणत टीका केली. पूर्वाश्रमीचे ममता बॅनर्जी यांचे सहकारी आणि भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हाला कोरोनाविरुद्ध पंतप्रधान मोदींची लस घ्यावी लागेल. ते (नरेंद्र मोदी) निवडून आलेले पंतप्रधान आहेत. त्यांच्याविरुद्ध बोलणे म्हणजे लोकशाहीविरुद्ध बोलणे आहे. त्यांच्याविरुद्ध बोलणे म्हणजे भारत मातेविरुद्ध बोलण्यासारखेच आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशकडे कोरोना लस नसल्यामुळे तुम्हाला मोदींचीच लस घ्यावी लागणार असल्याची टीका सुवेंदू अधिकारी यांनी ममतांवर केली.

व्हिलचेअरवरूनच ममता बॅनर्जी या प्रचारात उतरलेल्या आहेत. ममतांनी पूर्व मदिनापूर येथे रॅलीला संबोधित केले. यावेळी ममता म्हणाल्या, भाजपला निरोप द्या. आम्हाला भाजपा नको. आम्हाला मोदींचे तोंडही पाहायचे नाही. आम्हाला दंगल, चोर, दुर्योधन, दुःशासन, मीर जाफर नको असल्याचे म्हणत ममतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.