मोदींच्या एका निर्णयामुळे वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू झाले त्यांचे फॅन


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव सध्या वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंच्या तोंडी चर्चिले जात असून वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू मोदींच्या एका निर्णयामुळे त्यांचे फॅन झाले आहेत आणि त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेस्ट इंडिजचा विस्फोटक सलामीवीर ख्रिस गेल याने देखील गुणगाण केले आहेत.

संपूर्ण जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढावलेले दिसत आहे. काही देशांना तर या कोरोना व्हायरसचा खूप मोठा फटका बसला आहे आणि भारताने अशा देशांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. जगभरातील काही देशांना भारताने कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पाठवले आहेत. आतापर्यंत भूटान, मालदीप, मॉरिशस, बहरीन, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका या देशांना भारताने कोरोना लस पाठवली आहे. भारताने कॅरेबियन बेटावरही कोरोना लसीचे डोस पाठवले आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार आणि देशवासीयांचे मी आभार मानतो. त्यांनी जमैकाला कोरोना लस गिफ्ट म्हणून पाठवले आणि या महामारीपासून वाचण्यासाठी आम्हाला मदत केली, असे ट्विट ख्रिस गेलने केले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व्हिव्हिए रिचर्ड्स यांनी देखील ट्विट करत, मी अँटीगा आणि बार्बाडोस येथील लोकांच्या वतीने भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेचे आभार मानतो. आम्हाला त्यांनी कोरोना लस पाठवली. यामुळे भविष्यात दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील.