कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत मिशन टेस्टिंग


मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिशन टेस्टिंग राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 50 हजार टेस्ट मुंबईत दिवसाला करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठल्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहेत. मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर मिशन टेस्टिंगअंतर्गत अॅन्टिजन चाचण्या होणार आहेत.

मुंबईतील 25 प्रमुख मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची अॅन्टिजन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पॅलेडियम, फिनिक्स, रुणवाल, इन्फिनीटी, इनॉर्बिट यांसारख्या मोठ्या मॉलमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने लोक येतात. मुंबईतील सर्व मॉलमध्ये विक एन्डला लाखो लोकांची गर्दी होते. मोठ्या मॉलमध्ये प्रवेशासाठी अॅन्टिजेन चाचणी बंधनकारक केल्यास आपोआप गर्दीला आळा बसेल.

खाऊ गल्लीचा स्टाफ आणि मुंबईतील रेस्टॉरंटसच्या स्टाफची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील बाहेरगावच्या रेल्वे येणारे 7 मुख्य रेल्वे स्थानके त्यात वांद्रे, दादर, बॉम्बे सेंट्रल, सीएसएमटी, कुर्ला, अंधेरी, बोरिवली या स्थानकांवर दर दिवसाला प्रत्येकी किमान 1000 प्रवाशांच्या चाचण्या होणार आहेत. विशेषत: विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाचे विशेष लक्ष असेल. तसेच मुंबईतील मुख्य बस स्थानक, दादर, परळ येथे दररोज 1000 प्रवाशांच्या चाचण्या होणार आहेत. मुंबईत दिवसाला 50 हजार टेस्ट करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य आहे. दिवसाला सध्या 20 ते 23 हजार चाचण्या होत आहेत.