‘या’ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळाली कोरोना प्रतिबंधक लस


कोरोनाबाधितांची संख्या जगभरामध्ये पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. पण जिब्राल्टर नावाच्या छोट्याश्या देशाने या संकटाच्या काळामध्ये कमाल करुन दाखवली आहे. या देशाने आपल्या देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा पराक्रम केला आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी या देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. देशातील सर्व पात्र व्यक्तींना लसीचे दोन डोस देण्यात आल्याचे हॅनकॉक यांनी स्पष्ट केले आहे.

केवळ ३४ हजारांच्या आसपास जिब्राल्टरची लोकसंख्या आहे. या ठिकाणी चार हजार २६३ कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. देशातील ९४ जणांना कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. हॅनकॉक यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये यासंदर्भात माहिती देताना, मला ही गोष्ट सांगताना खूप आनंद होत आहे की काल (बुधवारी) जिब्राल्टर जगातील पहिला असा देश ठरला आहे, ज्या आपल्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केल्याचे सांगितले. या संकटाच्या प्रसंगी जिब्राल्टरच्या नागरिकांनी दाखवलेला संयम आणि साहसाचे मी कौतुक करतो, असे म्हणत हॅनकॉक यांनी जिब्राल्टरच्या नागरिकांचे कौतुक केले.

हॅनकॉक पुढे बोलताना यांनी, ब्रिटीश देशांच्या समुहामध्ये असणाऱ्या या देशातील लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे राबवण्यामध्ये सर्व देशांमधील सहकार्य मोलाचे ठरल्याचेही सांगितले. जिब्राल्टरचे प्रमुख फॅबियन पिकार्डो यांनी लसीकरणासाठी यूनायटेड किंग्डम सरकारचे आभार मानले. पीपीई कीट, लसी आणि चाचण्यांसाठी लागणारी सर्व आर्थिक मदत ब्रिटनने आम्हाला केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी असल्याचे पिकार्डो म्हणाले. जिब्राल्टरमध्ये सध्या कोरोनाचे २६ रुग्ण असले तरी त्यापैकी १० जण परदेशी आहेत. जिब्राल्टर हा स्वतंत्र देश असला तरी त्यावर ब्रिटनचे नियंत्रण असल्याने येथील लसीकरणासाठी ब्रिटननेच मदत केली.

जिब्राल्टरमधील ही लसीकरण मोहीम यशस्वी झाल्याने इतर देशांचाही आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. स्पेन आणि इतर युरोपियन देशांमध्ये एस्ट्राजेनेकाच्या लसीसंदर्भात वेगवेगळे दावे केले जात असतानाच जिब्राल्टरमधून आलेली ही बातमी दिलासा देणारी आहे. युरोपियन महासंघाची औषध नियामक संघटना असणाऱ्या युरोपियन मेडिसिन एजन्सीने एस्ट्राजेनेका ही कोरोना लस सुरक्षित असल्याचा खुलासा केला आहे. त्यानंतर इटली, फ्रान्स आणि इतर देशांनाही ही लस वापरण्यास सुरुवात केली.