पोलीस आयुक्त हेमंत नगराळे अॅक्शन मोडमध्ये; मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची पुनर्रचना


मुंबई : लवकरच मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची पुनर्रचना होणार असून मुंबई पोलीस दलात यापुढे कोणत्याही विभागात विशेष पथक नसेल, असा निर्णय मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला आहे. दोनच दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांची उचलबांगडी करुन हेमंत नगराळे यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

मुंबई पोलीस दलात कायदा आणि सुव्यवस्था, क्राईम, आर्थिक गुन्हे शाखा, प्रशासन आणि ट्राफिक असे पाच विभाग आहेत. यापैकी कायदा आणि सुव्यवस्था, क्राईम आणि आर्थिक गुन्हे शाखा या तीन विभागात तपासाच्या अनुषंगाने वेगवेगळी पथक, सेल निर्माण केली जात असतात. पण असा प्रकार यापुढे होणार नाही. कोणतेही विशेष पथक सुरु न ठेवण्याचा किंवा न बनवण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला आहे.

अशी अनेक पथके क्राईम ब्रांचमध्ये आहेत. ती सुरु ठेवायची की नाही, याचा लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. सचिन वाझे सीआययूचे प्रमुख होते. त्यांनी जो प्रकार केला आहे, त्याने पोलीस दल बदनाम झाले आहे. या पार्श्वभूमीवर नव्या आयुक्तांनी बदल करायचा निर्णय घेतला आहे.

आपल्या सर्वांना माहिती आहे, सध्या एका कठीण समस्येतून मुंबई पोलीस जात आहेत. पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मदतीने ही समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी नेमणूक केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारला आहे. मुंबई पोलिसांची जी प्रतिमा मलिन झाली आहे, त्याला येणाऱ्या दिवसात चांगले करण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या मुंबई शहरामधील अधिकारी कर्मचारी सगळ्यांचे सहकार्य, सहभाग या कार्यामध्ये लाभणार असल्याचेही हेमंत नगराळे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताना म्हटले होते.