मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझेचे गॉडफादर – नारायण राणे


नवी दिल्ली – सचिन वाझे प्रकरणाची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची या प्रकरणामुळेच उचलबांगडी करण्यात आली. आता भाजप नेते नारायण राणे यांनी यावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सचिन वाझेंचे गॉडफादर उद्धव ठाकरे आहेत. मुख्यमंत्रीच या सर्व प्रकरणाला जबाबदार आहेत. त्यांना एक दिवसही खुर्चीवर राहण्याचा अधिकार नसल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे.

संसद भवनात प्रसार माध्यमांशी नारायण राणेंनी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले की, सचिन वाझे आधी निलंबित होते. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना उद्धव ठाकरेंनी पोलीस खात्यामध्ये परत घेतले. परत घेतल्यानंतर थेट त्यांच्याकडे क्राईम इंटेलिजन्स यूनिटची जबाबदारीही दिली. वाझे केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच पोलीस दलात परत आले. यावरून मुख्यमंत्री हेच वाझेंचे गॉडफादर असल्याचे दिसून येते, असे नारायण राणे म्हणाले.

राणे पुढे म्हमाले की, वाझेंकडून मुख्यमंत्र्यांनी सर्व कामे करून घेतली. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आधी मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या झाल्या. यातील बहुतेक प्रकरणे वाझेंकडे देण्यात आली होती. वाझेंकडे ही प्रकरणे संबंध नसतानाही का दिली? असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला.