मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील बससेवा वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे बंद


भोपाळ: महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 21 मार्च पासून 31 मार्च पर्यंत मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांची आंतरराज्य बससेवा थांबवण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मागील चोवीस तासांत 25,833 महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 58 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 23,96,340 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यातील 21,75,565 रुग्ण बरे झाले आहेत तर 53,138 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात मुंबईत फक्त 2,877 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे आणि आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बुधवारी महाराष्ट्रात 23,179 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.

काल दिवसभरात मध्यप्रदेशमध्ये 917 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे आणि 500 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मध्यप्रदेशात आतापर्यंत 2,71,957 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, त्यातील 2,62,031 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 6,032 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 3,894 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.