कुणी बांधले हे स्मारक, आजही कायम आहे रहस्य

जगभरात कोट्यावधींच्या संखेने स्मारके आहेत. त्यातील काही अतिप्राचीन आहेत. बहुतेक स्मारकांचे निर्माण कालावधी आणि ती कुणी उभारली याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. मात्र इसवी सन पूर्वी ३२०० वर्षे आयर्लंडच्या कौंटी मथ मध्ये बायरन नदीच्या उत्तरेला ड्रोघेडा येथे असलेल्या स्माराकामागाचे गुढ अजून उलगडलेले नाही. या प्रागैतिहासिक स्मारकाचे नाव ‘ न्यू ग्रेंज’ असे असून नवपाषण काळात ते उभारले गेले असावे असा अंदाज आहे.

हे स्मारक अतिशय भव्य असून अतिप्राचीन स्टोन हेंज पेक्षाही ५०० वर्षे जुने आहे. दुरून पाहताना ते एखाद्या गोलाकार टेकडीप्रमाणे दिसते. या अतिविशाल स्मारकात आत जाण्यासाठी दगडी रस्ता आणि काही खोल्या आहेत. येथे माणसांची हाडे आणि कबरीसाठी लागणारे सामान मिळाले होते. या स्मारकाच्या उत्खननात अर्धवट जळलेली हाडे मिळाली होती त्यावरून येथे मानवी प्रेते ठेवली जात असावीत असा तर्क काढला गेला. कदाचित हे अंतिम संस्कार केंद्र असावे असेही म्हटले जाते.

पुरातत्व तज्ञाच्या मते या स्थळाचे काही धार्मिक महत्व असावे. त्यासाठी काही विशिष्ट पूजा येथे केल्या जात असाव्यात. मात्र हे स्मारक कुणी उभारले याचा काहीही तपास लागत नाही. १९६२ ते १९७५ या काळात येथे उत्खनन केले गेले. येथील एका खोलीत १९ मीटर लांबीचा एक मार्ग आहे. विशेष म्हणजे फक्त हिवाळ्यात सूर्योदयाच्या वेळी हा रस्ता प्रकाशमय होतो. यामागचे रहस्य अजून उलगडलेले नाही.