पुण्यात पुन्हा करोनाचा धुमाकूळ 

भारतात करोनाची दुसरी लाट आल्याचे सांगितले जात असतानाच महाराष्ट्रात आणि त्यातही पुन्हा पुण्यात करोनाचा धुमाकूळ सुरु झाला असून महाराष्ट्र पुन्हा करोना हॉट स्पॉट बनले आहे. गुरुवारी पुणे जिल्ह्यात एका दिवसात तब्बल ४९६५ नवे रुग्ण मिळाले असून ३१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. अॅक्विव्ह रुग्णांच्या बाबतीत पुणे राज्यात आघाडीवर असून हा आकडा ३५५३९ वर गेला आहे.

गतवर्षी करोनाचा प्रथम प्रसार झाला तेव्हा पाहिला रुग्ण पुण्यातच सापडला होता. तेव्हा करोना प्रसार वाढूनही करोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते पण पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. पुणे महापालिका क्षेत्रात २७९१, पिंपरी चिंचवड भागात १२७२ तर ग्रामीण भागात ९१० नवे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र अजून तरी लॉक डाऊन लागू करण्याबाबत निर्णय घेतला गेलेला नाही. त्याऐवजी मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई मोहीम जोरात सुरु केली गेली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तसे आदेश दिले आहेत.

देशमुख व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महापालिका कर्मचारी, पोलीस, आरोग्य अधिकारी यांच्या संपर्कात आहेत. पुण्यातील लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने पुढाकार घेऊन ४७ करोना लसीकरण केंद्रे सुरु केली आहेत.