जागतिक निद्रा दिवस ,१९ मार्च २०२१
चांगली झोप हे उत्तम आरोग्याचे मर्म आहे. आजकाल अतिशय व्यग्र जीवनशैलीमुळे अनेकांना आठ तास शांत झोप घेता येत नाही. अनेकांना निद्रा विकार जडले आहेत. जागतिक निद्रा दिवस शांत, चांगल्या झोपेचे महत्व समजावणे आणि जनतेत त्यासाठी जागृती करणे या उद्देशाने साजरा केला जातो. यंदा १९ मार्च रोजी हा दिवस साजरा होत आहे. विशेष म्हणजे या दिनाच्या तारखा बदलतात पण मार्च मध्येच हा दिवस साजरा केला जातो.
यंदाच्या जागतिक निद्रा दिनाची थीम ‘नियमित झोप, स्वस्थ भविष्य’ अशी आहे. झोप पूर्ण झाली असेल तर माणसाची कार्यक्षमता वाढते. आरोग्य सुधारते. त्यामुळे झोपेबाबत निष्काळजीपणा नको तर आठ तासाची झोप घ्यावीच असा सल्ला या निमित्ताने दिला गेला आहे. झोप न येणे ही सामान्य समस्या असल्याचा बहुतेकांचा समज असतो पण आता ही समस्या गंभीर बनली आहे. पूर्वी हा त्रास वयोवृध्द लोकांना अधिक होत असे पण आजकाल तरुण वर्गाला सुद्धा झोप न येणे हा त्रास होऊ लागला आहे.
दिनचर्येतील बदल आणि मोबाईलचा अति वापर ही त्यामागची मुख्य कारणे सांगितली जातात. रात्रीची झोप शांत हवी असेल तर झोपण्यापूर्वी १ तास अगोदर मोबाईल वापर बंद करावा, मसालेदार जेवण घेऊन नये तसेच रात्रीत वादविवाद किंवा नकारात्मक विचार करू नयेत असे त्यावरचे काही उपाय सांगितले जातात. झोपण्याचे आसन आणि उशी आरामदायी असावी. डोळ्यासमोर आनंदी, चांगली दृशे आणावीत आणि तसेच चांगले विचार आणि आठवणी मनात असाव्यात म्हणजे शांत झोप लागते.
झोपेबाबत काही रोचक गोष्टी सुद्धा आहेत. १५ टक्के लोकांना झोपेत चालण्याची सवय असते तर ५ टक्के लोकांना झोपेत बडबडण्याची सवय असते. जेव्हा आपल्याबाबत एखादी आनंददायी घटना घडते तेव्हा झोप उडते. पण अश्या वेळी कमी झोप सुद्धा पुरते. सस्तन प्राण्यात माणूस हा असा एकमेव प्राणी आहे जो झोपण्याची वेळ त्याच्या इच्छेनुसार लांबवू शकतो.
१९६४ मध्ये रँडी गार्डनर हा १७ वर्षाचा असताना त्याने २६४ तास आणि १२ मिनिटे जागे राहण्याचा विक्रम नोंदविला होता. आजही हा विक्रम अबाधित आहे.