अक्षयकुमारने अयोध्येत रामलला दरबारात केला रामसेतूचा मुहूर्त

बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार याने त्याच्या आगामी रामसेतू चित्रपटाचा मुहूर्त अयोध्येत रामलला दरबारात केला. त्यापूर्वी येथे पूजापाठ करण्यात आला. यावेळी अक्षयसोबत जॅकलीन फर्नांडीस, नुसरत भरुचा आणि चित्रपटाची टीम उपस्थित होती. मुहूर्त शॉट घेण्यापूर्वी अक्षय आणि त्याच्या टीमने राजसदनात जाऊन अयोध्या नरेश विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांची भेट घेतली.

राजपरिवार प्रवक्ते आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टी विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांनी अक्षय आणि त्याच्या टीमचे आतिथ्य केले. या चित्रपटाचे शुटींग अयोध्येच्या अनेक भागात होणार आहे. त्यात राजसदन, शरयू काठ, राम की पौडी आणि रामजन्मभूमी परिसराचा समावेश आहे.

अक्षयने राम की पौडी परिसरातील शुटींग लोकेशन पाहण्यासाठी या भागाला भेट दिली पण तेथे त्याला पाहण्यासाठी जनतेने इतकी गर्दी केली की सुरक्षा रक्षकांनी अक्षयला गाडीतून खाली उतरण्याची परवानगी दिली नाही. अक्षय या चित्रपटात पुरातत्ववेत्त्याची भूमिका करत आहे.