जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस; अॅस्ट्रॅजेनेका लस पूर्णपणे सुरक्षित, तिचा वापर सुरू ठेवा


नवी दिल्ली : बुधवारी जगभरातील देशांना जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसीचा वापर सुरू ठेवण्याची शिफारस केली. अनेक देशांनी नागरिकांमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर लसीच्या वापरावर स्थगिती आणली होती. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने लसीच्या सुरक्षेकडेही लक्ष देत असल्याचे म्हटले होते.

ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे डब्ल्यूएचओ, युरोपचे ड्रग रेग्युलेटर आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी स्वतः पुन्हा सांगितले आहे. या लसीच्या वापरामुळे रक्ताच्या गुठळ्या किंवा मेंदूतील रक्तस्त्राव होण्याचा धोका असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने देखील अ‍ॅस्ट्रॅजेनेकाला क्लीन चिट देत म्हटले की, लस आणि रक्ताच्या गुठळ्या याचा कोणताही संबंध असलेले एकही प्रकरण समोर आलेले नाही. फ्रान्स, स्पेन, इटली आणि जर्मनीने अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस वापरण्यास मनाई केली. बंदी आणताना या देशांनी असे म्हटले आहे की, लोकांनी लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची तक्रार केली आहे.

संयुक्त राष्ट्रच्या आरोग्य विभागाने एका निवेदनात म्हटले की, जागतिक आरोग्य संघटना ग्लोबल अ‍ॅडव्हायझरी कमिटी ऑन वॅक्सिन सेफ्टी सुरक्षेच्या दृष्टीने सावधपूर्वक मूल्यांकन करत आहे. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेचे असे म्हणणे आहे की, अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसीचा वापर सुरु ठेवला पाहिजे. मंगळवारी युरोपियन मेडिसीन एजन्सीने देखील देशांना ही लस वापरणे सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. रक्ताच्या गुठळ्या होण्याचा लसीशी काहीही संबंध नाही.

या लसीवर बंदी घातलेल्या फ्रान्सपासून व्हेनेझुएला आणि इंडोनेशियातील अनेक देशांनी असे सांगितले आहे की, लस घेतलेल्या लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या आणि मेंदूच्या रक्तस्त्रावाच्या अनेक प्रकरणांनंतर या लसीचा वापर करणार नाही. त्याचवेळी, तज्ञांनी असे म्हटले आहे की, या क्षणी लस ब्लड कॉटिंगशी संबंधित नसावी. युरोपियन युनियन देश आणि ब्रिटनमध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोना 19 लसीचे डोस घेतले आहेत. त्यापैकी फक्त 40 केसेसमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.