दहावी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी


मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी अ‍ॅप्रेंटिस म्हणजेच शिकाऊ पदांवरील नोकरीसाठी अर्ज करण्याची चांगली संधी आहे. उत्तर प्रदेशच्या झांसी शहरातील विविध ट्रेड्समध्ये उत्तर मध्य रेल्वेने एकूण 480 अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली असून 17 मार्च 2021 पासून ज्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या पदांसाठी होणार भरती : उत्तर मध्य रेल्वेच्या अधिसूचनेनुसार या भरती अंतर्गत फिटर, वेल्डर, मेकॅनिक, कारपेंटर आणि इलेक्ट्रिशियन अशी एकूण 480 पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता : एखाद्या मान्यताप्राप्त मंडळाकडून 50 टक्के गुणांसह उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. यासह आयटीआय प्रमाणपत्र संबंधित ट्रेडमधील असावा.

वयोमर्यादा : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. पण, राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियमांनुसार जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे.

अर्ज फी: सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्जासाठी 170 रुपये फी भरावी लागेल तर SC/ST आणि महिला उमेदवारांना फक्त 70 रुपये फी भरावी लागेल.

निवड प्रक्रियाः उत्तर मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या या पदांवर नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा व मुलाखत देण्याची गरज नाही. पण, दहावीच्या गुणवत्ता यादीच्या आधारे त्यांची निवड केली जाणार आहे.

अशा प्रकारे कराल अर्ज – या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पोर्टल mponline.gov.in वर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्याचबरोबर उत्तर मध्य रेल्वेच्या ncr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर भरती विभागात दिलेल्या लिंकला भेट देऊन अधिक माहिती प्राप्त करु शकता.