नांदेड जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कठोर निर्बंध


नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टोरेंट, खाद्यगृह, परमिट रूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भांडार 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. पण या निर्णयामुळे वरील आस्थापनांवर उपजिविका अवलंबून असलेल्यांना अर्थिक अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन तसेच नागरिकांच्या सोयीसाठी वरील आस्थापनांना पार्सल सेवा रात्री 10 वाजेपर्यंत ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच 31 मार्चपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व जीम, व्यायामशाळा, सार्वजनिक उद्याने बंद राहतील, असे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी एकजुटीने मुकाबला करण्याची गरज आहे. त्यासाठी मास्क वापरणे, सतत हात धुणे आणि शारिरीक अंतर राखणे आवश्यक आहे. आपण याची काटेकोर अंमलबजावणी केली, तर प्रशासनावर कठोर निर्णय घेण्याची वेळ येणार नाही. तसेच नागरिकांनी वरील त्रिसूञीचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करावे आणि नांदेड जिल्हा कोरोनामुक्त करण्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केले आहे.

तसेच काटेकोर अंमलबजावणी या निर्णयांची केली आणि कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली, तर परिस्थितीचा आढावा घेऊन या निर्णयांमध्ये 31 मार्च पूर्वी शिथीलता देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.