पुण्यातून 28 मार्चपासून पाच मोठ्या शहरांसाठी सुरू होणार नॉन स्टॉप विमानसेवा


पुणे – २८ मार्चपासून पुण्यातून पाच मोठ्या शहरांसाठी खासगी विमान कंपनी स्पाइसजेट नॉन स्टॉप विमानसेवा सुरू करत आहे. दरभंगा, दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि वाराणसी या पाच शहरांसाठी पुण्यातून विमानसेवेला लवकरच सुरूवात होणार आहे.

हे पाऊल मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी उचलण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. एका निवेदनाद्वारे कंपनीने याबाबतची माहिती दिली. किमान 66 नवीन फ्लाईट्स कंपनी सुरु करणार आहे. शिवाय काही विशिष्ट मार्गासाठी अधिकच्या फ्लाईट सुरु करण्यात येतील. ही सेवा २८ मार्चपासून सुरु होईल.

विमान प्रवासाच्या छोट्या शहरांमधून वाढत्या मागणीमुळे स्पाइसजेट आता UDAN योजनेअंतर्गत नाशिक, दरभंगा, दुर्गापूर आणि ग्वाल्हेरला मेट्रो शहरांसोबत जोडण्यासाठी नव्या फ्लाईट्स सुरु करणार असल्याचेही स्पाइसजेटने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरभंगा, दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि वाराणसी या शहरांशी पुण्याला विमानाद्वारे जोडणारी स्पाइसजेट ही पहिली कंपनी असल्याचेही कपंनीने म्हटले आहे. दरम्यान, नाशिक शहरावरुन दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरु या शहरांसाठी स्पाइसजेटने सेवा सुरू केली होती, आता कोलकाता शहरासाठीही विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.