मोदी सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने संदर्भात मोठी घोषणा


नवी दिल्ली : कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी संसदेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देण्यात येणारी रक्कम वाढविण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती दिली. शेतकरी कुटुंबांना अशा परिस्थितीत पूर्वीप्रमाणे वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

देशातील शेतकर्‍यांना दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 डिसेंबर 2019 पासून आधार आवश्यक झाला आहे. दोन हजार रुपयांप्रमाणे ही रक्कम तीन टप्प्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांनी निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होते. लोकसभेत तोमर यांनी म्हटले, की पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. महाराष्ट्रात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अपात्र शेतकऱ्यांकडून या रकमेची वसूली करण्यात आल्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना तोमर म्हणाले, की यंदा 11 मार्चला तब्बल 78.37 कोटी रुपयांची वसुली केंद्र सरकारने केली आहे.