सचिन वाझेंच्या एनआयए चौकशीमुळे ‘मातोश्री’ अडचणीत – रवी राणा


मुंबई – मनसुख हिरेन यांची ज्याप्रकारे हत्या झाली, त्याचप्रमाणे सचिन वाझे यांच्या जीवालाही धोका असून त्यांना संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार रवी राणा यांनी केली आहे. सचिन वाझेंचीही मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे हत्या होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ‘मातोश्री’ सचिन वाझेंच्या एनआयए चौकशीमुळे अडचणीत आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. व्हिडीओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार अडचणीत येणार असून आगामी काळात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा रवी राणा यांनी केला आहे.

रवी राणा म्हणाले की, तपासात एनआयएला जी माहिती सचिन वाझेंनी दिली आहे, त्यावरुन महाराष्ट्रात येणाऱ्या काळात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त परमबीर सिंग यांना बाजूला करुन हे प्रकरण संपणारे नाही. महाराष्ट्र सरकारच्या अवतीभोवती याचे धागेदोरे फिरत आहेत. सचिन वाझेंना प्लानिंग करण्यासाठी कोणी मदत केली हेदेखील लवकरच समोर येईल.

हिरेन यांचा मृत्यू ज्याप्रकारे झाला त्याप्रकारे सचिन वाझे यांच्या जीवितासही धोका आहे. ‘मातोश्री’ अडचणीत असून सचिन वाझेंच्या जीवाला धोका आहे. म्हणून त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवले पाहिजे. एनआयने पूर्ण लक्ष ठेवून त्यांना संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस करत होते. पण त्यांची हत्या झाली. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांचीही हत्या केली जाण्याची शक्यता असल्याचा दावा रवी राणा यांनी केला आहे.