आशिष शेलार यांना उच्च न्यायालयाने घेतले फैलावर; आधी पाच लाख जमा करा, मग याचिकेवर सुनावणी


मुंबई – कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने औषधांसाठी तसेच जंतुनाशकांसाठी वाढीव दराने निविदा मागवल्या असून यात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या भाजप आमदार आशिष शेलार यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने फैलावर घेतले. न्यायालयात आधी पाच लाख जमा करा, मग याचिकेवर सुनावणी घेऊ, अशा शब्दांत शेलार यांना मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने बजावले.

औषध तसेच जंतुनाशकांसाठी 21 ऑगस्ट 2020 साली महानगरपालिकेने निविदा काढल्या होत्या. महानगरपालिकेने या निविदा काढताना जागतिक आरोग्य संघटना तसेच केंद्र सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही. तसेच जंतुनाशकांचा दर्जाही राखला गेला नसल्याचा आरोप करत आमदार आशिष शेलार यांनी अॅड. दीपा चव्हाण यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली असून आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश पुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. महानगरपालिकेची निविदा प्रक्रिया ही नियमाप्रमाणे असल्याचा युक्तिवाद मुंबई महापालिकेमार्फत आज करण्यात आला.