अमेरिकेत जन्मलेल्या या नवजात बालकाच्या शरीरात आढळल्या कोरोना व्हायरसच्या अँटिबॉडिज


न्यूयॉर्क : जगात एका अनोख्या बाळाचा जन्म झाला असल्याचा दावा अमेरिकेतील बालरोगतज्ञांनी केला आहे. कोरोना महामारीने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. परंतु, एक सकारात्मक माहिती अमेरिकेतील बालरोगतज्ञांनी केलेल्या दाव्यामुळे समोर आली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, कोरोना व्हायरसच्या अँटिबॉडिज अमेरिकेत जन्म झालेल्या या नवजात बालकाच्या शरीरात आढळल्या आहेत. बाळाचा जन्म कोरोनाच्या अँटिबॉडिजसह होणे, असे पहिल्यांदाच घडले आहे. दरम्यान, गरोदरपणात कोरोनाच्या लसीचा पहिला डोस या नवजात बाळाच्या आईला देण्यात आला होता.

यासंदर्भात आरोग्य विज्ञान संबंधित ईप्रिंट प्रकाशित करणाऱ्या ‘मेडआर्काइव’ वर प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, गरोदरपणाच्या 36व्या आठवड्यात बाळाच्या आईला मॉर्डना लसीचा डोस देण्यात आला होता. लसीचा डोस घेतल्यानंतर तीन आठवड्यांनी महिलेने एका निरोगी बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. ज्यामध्ये बाळाच्या रक्तात अँटिबॉडिज आढळून आल्याचा खुलासा करण्यात आला.

दरम्यान, या संशोधनाचे पुनरावलोकन अद्याप करण्यात आलेले नाही. अमेरिकेतील फ्लोरिडाच्या अटलांटिक विश्वविद्यालयाचे सह लेखक पॉल गिल्बर्ट आणि चाड रूडनिक यांनी सांगितले की, एखाद्या नवजात बाळाच्या शरीरात कोरोनाच्या अँटिबॉडिज आढळण्याची ही पहिलीच घटना असल्याचे समोर येत आहे.

बाळाची आई आणि बाळ दोघेही सुखरुप असून बाळाची आई बाळाला नियमितपणे स्तनपान करत आहे. तसेच बाळाच्या आईला नियमांनुसार, लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनी देण्यात येणार आहे. याआधीच्या एका संशोधनात सांगण्यात आले होते की, कोरोनामुक्त झालेल्या गरोदर स्त्रियांच्या पोटातील बाळाच्या शरीरात अँटिबॉडिज पोहोचवण्यात आईशी जोडलेली नाळ अयशस्वी ठरत असल्याचे सांगण्यात आले होते. अशातच, या नव्या संशोधनात सांगण्यात आले आहे की, जर आईला कोरोनाची लस देण्यात आली असेल, तर त्यामुळे कोरोनाच्या अँटिबॉडिज बाळाच्या शरीरात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही कमी होतो.