‘शार्ली हेब्दो’चे ब्रिटीश राजघराण्यावर आणखी एक वादग्रस्त व्यंगचित्र


ब्रिटन – ऑपरा विन्फ्रेला मेगन मार्कल आणि तिचा पती हॅरी यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये ब्रिटीश राजघराण्यावर वर्णद्वेषाचा आरोप केला होता. राजघराण्याला आपल्या बाळाचा रंग काय असेल याची चिंता असल्याचा आरोप मेगनने केला होता. जगभरामध्ये या प्रकरणावरुन चर्चा सुरु असतानाच फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ या साप्ताहिकाने याच विषयावर छापलेल्या व्यंगचित्रावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे चित्र म्हणजे आगीत तेल ओतण्याचा प्रकार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) या मेगनच्या मानेवर गुडघा ठेऊन उभ्या असल्याचे ‘शार्ली हेब्दो’ने काढलेल्या या कव्हर पेजवरील चित्रामध्ये दाखवण्यात आले आहे. मागील वर्षी जून महिन्यामध्ये अमेरिकेमधील मिनिसोटा राज्यातील चार पोलिसांनी जॉर्ज फ्लॉईड या निशस्त्र तरुणाच्या मानेवर भर रस्त्यात ९ मिनिटे पाय दाबून ठेवून त्याची हत्या केली. अमेरिकेमध्ये याच प्रकरणावरुन नंतर मोठे आंदोलनही झाले होते. त्यानंतर वर्णद्वेषाला विरोध करण्यासाठी गुडघ्यावर बसून आपला पाठिंबा देताना अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडू दिसले होते. ‘शार्ली हेब्दो’ने याच घटनेचा संदर्भ वापरुन हे चित्र रेखाटले आहे. मेगन ही यामध्ये जॉर्जच्या जागी अन्याय सहन करणारी व्यक्ती म्हणून दाखवण्यात आली आहे.

बर्किंगहॅम मेगनने का सोडले? या मथळ्याखाली हे व्यंगचित्र छापण्यात आले आहे. मानेवर राणीने पाय दिलेल्या अवस्थेत मेगन, कारण मला तिथे गुदमरल्यासारखे वाटत होते, असे उत्तर देताना व्यंगचित्रात दिसत आहे. अनेकांनी या व्यंगचित्रावर नाराजी व्यक्त केली आहे. या चित्राबद्दल वर्णद्वेषाविरोधात लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या हलिमा बेगम यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली आहे. राणी जॉर्जची हत्या करणाऱ्याच्या जागी दाखवून ती मेगनला चिरडत असल्याचे दाखवले आहे? मेगन गुदरमल्यासारखे वाटत असल्याचं सांगत आहे? या चित्राने काहीच साध्य होत नसून यामधून कोणालाही हसुही येत नाही किंवा तुम्ही वर्णद्वेषाविरोधात आवाजही उठवत नसल्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळत आहे आणि नाराजी ओढवून घेतली जात असल्याचे हलिमा यांनी म्हटले आहे.