‘रामायण’मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश


नवी दिल्ली – ९०च्या दशकामध्ये लोकप्रिय मालिका असलेल्या ‘रामायण’मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी दिल्लीमध्ये पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला आहे. भाजपकडून त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाईल याविषयी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. पण, अरुण गोविल यांचा आगामी ५ राज्यांमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवेश झाल्यामुळे निवडणुकांच्या प्रचारात त्यांचा वापर केला जाऊ शकतो. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी देखील नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या प्रचारसभांमधून ममता बॅनर्जी आणि डाव्या पक्षांवर मिथुन चक्रवर्ती जोरदार टीका करत आहेत.

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने सुमारे ३ दशकांपूर्वी भारतभरातील प्रेक्षकांवर गारूड केले होते. टेलिव्हिजन क्षेत्रातील त्या काळातील अनेक विक्रम या मालिकेने मोडले होते. विशेष म्हणजे या मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल हे बाहेरच्या जगात वावरताना देखील त्यांना लोक रामच समजून त्यांच्या पाया पडत त्यांचा गौरव करायचे. याचे अनेक किस्से स्वत: अरुण गोविल यांनीच अनेकदा सांगितले आहेत.

अरुण गोविल यांनी भाजपमध्ये केला तेव्हा भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह उपस्थित होते. अरुण गोविल यावेळी म्हणाले, याआधी मला राजकारण कळत नव्हते. पण मला जे वाटते ते मी करून टाकतो. आता मला देशासाठी काहीतरी करायचे आहे आणि भाजप हा सगळ्यात चांगला पर्याय असल्याचे म्हणतानाच त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला. मी पहिल्यांदा असे पाहिले की जय श्री राम या घोषणेची ममता बॅनर्जी यांना अॅलर्जी झाली. जय श्रीराम फक्त एक घोषणा नसल्याचे ते यावेळी म्हणाले.