गौतम अदानी जॅक मा याना मागे टाकून बनले जगातील २५ वे श्रीमंत

यंदाच्या म्हणजे २०२१ च्या वर्षात सर्वाधिक वेगाने कमाई करून अमेझॉनच्या जेफ बेजोस आणि टेस्लाच्या एलोन मस्क यांना मागे टाकणारे भारतीय उद्योजक गौतम अदानी यांनी आणखी एक सफलता मिळविली आहे. जगातील श्रीमंत यादीत अदानी यांनी चीनी उद्योजक आणि अलीबाबा समूहाचे माजी प्रमुख जॅक मा यांना मागे टाकून २५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी या यादीत पहिल्या दहा श्रीमंतात सामील आहेत.

परदेशी मिडिया रिपोर्ट नुसार गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ५१ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. जॅक मा यांची एकूण संपत्ती ५०.२० अब्ज डॉलर्स आहे. २०२१ हे वर्ष अदानी यांच्यासाठी अतिशय लकी ठरले आहे. या वर्षात त्यांच्या संपत्तीत १७.१ अब्ज डॉलर्सने वाढ झाली असून त्यांच्या कंपनीचे शेअर्स तेजीत आहेत.