कोण आहेत नवे मुंबई पोलीस कमिशनर नगराळे?

सचिन वाझे प्रकरणात मुंबईच्या पोलीस कमिशनर पदावरून परमवीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यावर त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती झाली आहे. तीन महिन्यापूर्वीच नगराळे यांच्याकडे अतिरिक्त पोलीस कमिशनरपदाची जबाबदारी सोपविली गेली होती. त्या जागी आता रजनीश शेठ यांची नियुक्ती केली गेली आहे.

हेमंत नगराळे यांनी महाराष्ट्रात अनेक पदांवर काम केले असून ते १९८७ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे त्यांनी दीर्घकाळ सीबीआय मध्येही काम केले आहे. तसेच महाराष्ट्रातील नक्षलवादी गडचिरोली भागात सुद्धा अनेक वर्षे काम केले आहे. मुंबईवर २६/११ चा हल्ला झाला तेव्हा नगराळे मुंबईतच कार्यरत होते आणि कुलाबा पोलीस ठाण्याच्यावर त्यांचे निवासस्थान होते. येथून जवळच असलेल्या लियोपोल्ड कॅफे येथे गोळीबाराचा आवाज ऐकू आला त्यावेळी नगराळे घरात टी शर्ट आणि हाफ पँट अश्या पोशाखात जेवण करत होते. मात्र गोळ्यांचा आवाज ऐकताच या गोळ्या एके ४७ मधून झाडल्या जात असल्याचा अंदाज त्यांना आला आणि त्यांनी तत्क्षणी आहे त्याच पोशाखात रिव्होल्व्हर घेऊन घटनास्थळी धाव घेतली होती.

मात्र या वेळेपर्यंत दहशतवादी ताज हॉटेल मध्ये घुसले होते तेव्हा नगराळे यांनी तेथे धाव घेऊन आत जाणाऱ्या लोकांना बाहेरच थांबविले शिवाय आत अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी मदत केली. ताज बाहेर आरडीएक्स भरलेली बॅग होती त्यातील बॉम्ब निकामी करण्यासाठी त्यांनी बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकास मदत करून मोठा धोका टाळला होता. त्यावेळी त्यांच्या बहादुरीची खूप चर्चा झाली होती.

विशेष बाब म्हणजे ते नवी मुंबईचे पोलीस कमिशनर असताना आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा २०१८ मध्ये नगराळे यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई केली गेली होती. त्याची हकीकत अशी की रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज बुडवेगिरी प्रकरणात त्यांनी बँकेचे अध्यक्ष शेकापचे आमदार जयंत पाटील आणि संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल करताना विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते ती नगराळे यांनी घेतली नव्हती. यामुळे त्यांना निलंबनाला सामोरे जावे लागले होते.