54 लाख लसी दिलेल्या असताना आतापर्यंत 23 लाख लसीच का टोचल्या?; जावडेकरांचा महाराष्ट्र सरकारला सवाल


नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोना लसीकरणावरून आता तू तू मै मै सुरू झाली आहे. दर आठवड्याला लसीचे 20 लाख डोस देण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली आहे. लसीचे अतिरिक्त डोस महाराष्ट्राला देण्याची मागणी केंद्राकडे शिवसेनेच्या खासदारांनीही केली आहे. त्यावर, 54 लाख कोरोनाच्या लसी महाराष्ट्राला दिल्या. मग आजवर केवळ 23 लाख लसीच का टोचण्यात आल्या? असा सवाल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.

महाराष्ट्र सरकारला कोरोना लसीकरणावरून प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून फटकारले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ 23 लाख लस टोचण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने 54 लाख लसी देऊनही अत्यंत कमी लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात केवळ 56 टक्के लसीकरण करण्यात आल्याचे जावडेकर यांनी सांगितले.


राज्यात कोरोनाचे अतिरिक्त डोस शिवसेनेचे खासदार मागत आहेत. पूर्वी कोरोना संकटात महाराष्ट्रात योग्य नियोजन झाले नाही. आता लसीकरणातही तेच होत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्याचवेळी नेमके जावडेकर यांनी ट्विट केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

देशात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झाला आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 17864 रुग्ण सापडले आहेत. तर केरळ, कर्नाटक आणि पंजाबमध्ये एक हजार रुग्ण सापडले आहेत.