अशा प्रकारे पुणे शहराचे लसीकरण दोन महिन्यात होऊ शकते पूर्ण – महापौर मुरलीधर मोहोळ


पुणे – देशभरात केंद्र सरकारच्या आदेशानुसार कोरोना लसीकरणला सुरुवात झाली असून, आजअखेर १ लाख ७५ पुण्यातील नागरिकांना लस देण्यात आलेली आहे. पुणे शहराची लोकसंख्या लक्षात घेता, दररोज ३० ते ४० हजार नागरिकांना कोरोना लसीकरण करण्याची गरज आहे. पण सध्या १३ ते १४ हजार नागरिकांना लसीकरण केले जात आहे. लसीकरण वाढविल्यास पुणे शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण दोन महिन्यात पूर्ण होईल, असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. पण राज्य आणि केंद्र सरकारने यासाठी योग्य समन्वय साधून लसीकरण वाढवावे, अशी मागणी देखील त्यांनी केली. तर यामुळे शहरातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येण्यास अधिक मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसचे, मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले की, राज्यातील अनेक भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रशासन काम करीत आहे. पण त्यावर लॉकडाउन हा पर्याय नाही. तसे झाल्यास सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात न आल्यास भविष्यात नव्याने पावले उचलली जाऊ शकतात, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

त्याचबरोबर, कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन, आपली सर्व यंत्रणा सक्षम आहे. पण शहरातील ८० टक्के रुग्ण हे होम आयोसोलेशनमध्ये असून, सध्या आपल्याकडे ४ हजार ३०० बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी साधारण २ हजार २०० बेड रिक्त असून भविष्यात जम्बो रुग्णालय देखील सुरू केले जाईल. पण गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे नागरिकांनी टाळावे, तसेच सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.