भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेली टी-20 मालिका रद्द न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी


अहमदाबाद – एका अज्ञात व्यक्तीने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेली टी-20 मालिका रद्द न केल्यास आत्महत्या करेन, अशी धमकी दिली आहे. गुजरातमधील चांदखेडा पोलीस स्थानकात याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.व्ही. पटेल यांना १२ मार्च रोजी गांधीनगरमधून पंकज पटेल नावाच्या व्यक्तीने फोन केला. विशेष म्हणजे भारत विरुद्ध इंग्लंड सामने अहमदाबादच्या ज्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहेत, त्या स्टेडियमच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पथकात पटेल यांचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता जर भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका रद्द केली नाही तर आत्मदहन करेन, अशी धमकी त्याने पटेल यांना दिली.

सोशल मीडियात शनिवारी त्याच्या धमकीची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामना बघायला येणाऱ्या प्रेक्षकांकडून नियमावलीचे पालन होत नाही, हे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे जर भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका रद्द केली नाही, तर आपण आत्मदहन करु, अशी धमकी त्याने पटेल यांना दिली.

गुजरात सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठीही धमकी देणाऱ्याने अवमानकारक भाषेचा वापर केला. मी त्याला नाव विचारल्यावर त्याने गांधीनगरमधून पंकज पटेल बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर मी लगेच गांधीनगर पोलीस कंट्रोल रुमला फोन केला आणि त्याचा फोन नंबर अधिकाऱ्यांना दिला, असे पटेल यांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे. अहमदाबादच्या चांदखेडा पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम 505 (2), 507, 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.