विशेष न्यायालयाने फेटाळले वाझे यांचे तीन अर्ज


मुंबई – विशेष न्यायालयाने मंगळवारी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या आरोपप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अटक बेकायदा असून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा आणि पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्याचा दावा फेटाळला.

त्याचवेळी न्यायालयाने वकिलाला भेटू देण्याची मागणी अंशत: मान्य केली. वाझे यांच्या चौकशीच्या वेळी वकिलांना सोबत राहण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. वाझे तपासात सहकार्य करत नसल्यामुळेच त्यांना अटक केल्याचे एनआयएने सोमवारच्या सुनावणीत स्पष्ट केले होते. शिवाय वाझे हे चौकशीला येताना सोबत आपला भ्रमणध्वनी घेऊन आले नव्हते आणि कुटुंबियांचा संपर्क क्रमांक देण्यासही त्यांनी नकार दिल्यामुळे अटकेच्या वेळी ते मुंबई पोलिसांच्या ज्या कार्यालयात कार्यरत होते, तेथे संपर्क साधून त्यांच्या अटकेची माहिती देण्यात आल्याचा दावाही एनआयएने केला होता. वाझे यांना वकिलाला भेटू देण्यास आपली काहीच हरकत नसल्याचेही एनआयएने स्पष्ट केले होते.

मंगळवारी वाझे यांनी केलेल्या अर्जांवर सुनावणी झाली. न्यायालयाने त्यावेळी वकिलांबाबत वाझे यांनी केलेली मागणी अंशत: मान्य केली. तसेच वाझे हे पोलीस अधिकारी आहेत. त्यांना त्यांचे अधिकार माहीत आहे आणि एनआयएने सादर केलेल्या कागदपत्रांवरून त्यांच्या अटकेबाबत कळवण्यात आले होते, असे नमूद करत न्यायालयाने त्यांचे अन्य अर्ज फेटाळून लावले.