कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळेत रोखणे गरजेचे : नरेंद्र मोदी


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कोरोनाच्या स्थितीवरुन सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा केली. त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती या विषयावर चर्चा केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळेत रोखणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोरोना बाबतच्या नियमांचे पालन करणे देखील गरजेचे आहे. कोरोनाविरोधातील गेल्या वर्षभरातील लढाईचे यश बेजबाबदारीत बदलले गेले नाही पाहिजे. वेळेत टेस्टिंग आणि ट्रेसिंग होणे गरजेचे आहे. रॅपिड टेस्टवर अनेक राज्यांमध्ये जोर दिला जात आहे. पण आरटीपीसीआर टेस्ट 80 टक्क्यांच्यावर ठेवायला हव्यात, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

यावेळी कोरोनाचा प्रसार टियर-2 आणि टियर-3 शहरांत देखील वेगाने होत आहे. या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव याआधी जास्त झाला नव्हता. पण कोरोना जर ग्रामीण भागात पसरला, तर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसेल. छोट्या शहरांमध्ये कोरोना चाचण्या वाढवाव्या लागतील. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आदी राज्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक राज्यांमध्ये लसी वापराविना पडून आहेत, याबाबत नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली. कोरोना लस वाया जाण्याची समस्या गंभीर असून ती वेळीच सुधारायला हवी. तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये कोरोना लस वाया जाण्याचे प्रमाण 10 टक्के आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये हे प्रमाण जवळपास तेवढेच असल्याचे मोदींनी म्हटले.

एक वर्षाहून अधिकचा काळ कोरोना विरोधातील लढाईला झाला आहे. कोरोनाचा जसा सामना भारतीय नागरिकांनी केला, ते एक उदाहरण बनले आहे, त्याची प्रशंसाही झाली. देशात आज 96 टक्के लोक कोरोनामुक्त झाले आहेत. काही राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील 70 जिल्ह्यांत ही वाढ 150 टक्क्यांपर्यंत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला वेळीच रोखले पाहिजे. यासाठी आपल्याला निर्णायक पावले उचलावी लागतील, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.