आयपीएल संपेपर्यंत सर्व घरगुती क्रिकेट स्पर्धा बीसीसीआयने केल्या स्थगित


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा एकदा वाढ होऊ लागल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने देशांतर्गत सर्व वयोगटातील क्रिकेट स्पर्धा स्थगित केल्या आहेत. विनू माकंड चषक स्पर्धा या निर्णयामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

राज्यांमधील क्रिकेट मंडळांना बीसीसीआयने पत्र लिहून यासंदर्भातील माहिती दिली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कोरोना परिस्थितीचा संदर्भ देत सध्या सर्व वयोगटातील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. वेगवेगळ्या शहरांमधील प्रवास आणि बायो बबलसारख्या गोष्टींची आवश्यकता या स्पर्धांमध्ये लागत असल्याने त्या सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशभरामध्ये सुरु असणाऱ्या लॉकडाउनमुळे घरगुती क्रिकेटचा यंदाचा सीजन म्हणजेच २०२०-२१ चा सीजन उशीरा सुरु झाला होता. घरगुती क्रिकेट स्पर्धांना अगदी जानेवारी २०२१ मध्ये सुरुवात झाली. यासंदर्भातील निर्णय बीसीसीआयच्या ८९ व्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीमध्ये घेण्यात आला होता. आयपीएल लिलावाआधी सय्यद मुस्ताक अली चषक स्पर्धेपासून घरगुती क्रिकेट स्पर्धांना पुन्हा सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विजय हजारे चषक ही देशांतर्गत टी-२० मालिका यशस्वीपणे खेळवण्यात आली. या मालिकेतील सामने देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये खेळवण्यात आले. १४ मार्च रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन विरुद्ध मुंबई क्रिकेट असोसिएशनदरम्यानचा अंतिम सामना खेळवण्यात आल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

सध्या महिलांच्या वरिष्ठ गटातील एकदिवसीय सामन्यांची मालिका देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवली जात असून अंतिम सामना चार एप्रिल रोजी होणार आहे. या मौसमात वेगवेगळ्या वयोगटातील जास्तीत जास्त घरगुती सामने खेळवण्याचा आमचा प्रयत्न असला, तरी सध्याची परिस्थिती पाहता आम्हाला सर्वच वयोगटातील क्रिकेट मालिका स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि सामन्यांसाठी एका शहरामधून दुसऱ्या शहरात करावा लागणारा प्रवास, क्वारंटाइनसंदर्भातील नियम आणि बायो बबल्स यासारख्या सर्वच गोष्टी लक्षात घेता हे सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे शाह यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

तसेच बीसीसीआयच्या सचिवांनी देशामध्ये लवकरच बोर्डाच्या परीक्षा होणार असून सर्वच वयोगटातील घरगुती क्रिकेट मालिका आयपीएलनंतर खेळवणे फायद्याचे ठरेल असे या पत्रामध्ये म्हटले आहे. आयपीएलचा २०२१ चा हंगाम ९ एप्रिल ते ३० मे दरम्यान खेळवला जाणार आहे. काही राज्यांमधील परिस्थिती सामने आयोजित करण्यासारखी नाही. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकरच होणार असल्याने सामने रद्द केल्यास तरुण क्रिकेटपटुंना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल. तसेच आमच्या खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा याचा आमचे सर्वात आधी प्राधान्य आहे. आयपीएल २०२१ नंतर शक्य असेल तेव्हा नक्कीच आम्ही सर्व वयोगटातील क्रिकेटचे सामने आयोजित करु, अशी मला खात्री असल्याचेही शाह यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.