तब्बल 20 वर्षानंतर ‘गदर’च्या सिक्वेलमध्ये झळकणार सनी देओल आणि अमिषा पटेल


तब्बल २० वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सनी देओल, अमीषा पटेल यांची ‘गदर- एक प्रेमकथा’ एका वेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेली ही प्रेमकथा प्रेक्षकांना फारच आवडली होती. अमरीश पुरी यांचे रौद्ररुप, सनी देओलची दमदार अॅक्शन आणि अमिषा पटेलचे मातृप्रेम अशा मनोरंजानाने परिपूर्ण असलेल्या गदर चित्रपटाने त्याकाळी प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच जादू केली होती. या चित्रपटातील गाणीदेखील त्याकाळी प्रचंड गाजली होती.

आता ही प्रेमकथा पुन्हा एकदा एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर- एक प्रेमकथा’ या चित्रपटाचा सिक्वल लवकरच बनवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या सिक्वलची तयारी सिने दिग्दर्शक अनिल शर्मा करत असल्य़ाचे वृत्त आहे. या चित्रपटाच्या सिक्वलसाठी प्लॉट आणि स्क्रिप्टवर कामदेखील सुरु करण्यात आल्याचे एका वृत्तात सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या सिक्वलमध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेल झळकणार आहेत. त्याचबरोबर ‘गदर- एक प्रेमकथा’ या चित्रपटात सनी देओलच्या मुलाची भूमिका साकारणारा उत्कर्ष हा देखील या चित्रपटात झळकणार आहे. उत्कर्ष हा दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा असून ‘गदर’च्या सिक्वलमध्ये उत्कर्ष मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 2018 सालात आलेल्या ‘जीनियस’ या चित्रपटातून उत्कर्षने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती.

यासंदर्भात मिड डे ने दिलेल्या वत्तानुसार दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी चित्रपटाच्या सिक्वलबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी सिक्वलवर चर्चा सुरु असून अद्याप काही सांगू शकत नाही, पण योग्य वेळ आल्यावर त्याची अधिकृत घोषणा केली जाईल, असे म्हटले आहे.