निती अंबानींनी पाहुण्या प्राचार्या म्हणून सहभागी व्हावे यासाठी बनारस हिंदू विद्यापीठाचे पत्र


वाराणसी – बनारस हिंदू विद्यापीठामध्ये (बीएचयू) देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी यांची पत्नी निता अंबानी यांना पाहुण्या प्राचार्या (व्हिजिटींग फॅकल्टी) नियुक्त करण्याच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. व्यवस्थापन या निर्णयामधून चुकीचा आदर्श घालून देत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात मंगळवारी विद्यापीठाचे कुलगुरू राकेश भटनागर यांच्या घरासमोर ४० विद्यार्थ्यांनी आंदोलन करत हा निर्णय मागे घेण्यासंदर्भातील निवेदन कुलगुरूंना दिले आहे.

रिलायन्स फाऊण्डेशनला बीएचयूमधील सामाजिक शास्त्र विभागाने पाठवलेल्या पत्रामध्ये निता अंबानी यांनी विद्यापीठामधील महिला अभ्यास केंद्रामध्ये पाहुण्या प्राचार्या म्हणून सहभागी व्हावे अशी विनंती करणारे पत्र पाठवले होते. विशेष म्हणजे केवळ निता अंबानी यांना पत्र पाठवण्यात आले असले तरी विद्यापीठातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिजिटींग फॅकल्टी पदासाठी उर्वरित दोन जागांपैकी एका जागेसाठी उद्योगपती गौतम अदानींची पत्नी प्रिती अदानी यांचा विचार केला जात आहे. तसेच तिसऱ्या जागेसाठी युनायटेड किंग्डममधील भारतीय वंशाचे उद्योजक लक्ष्मी मित्तल यांची पत्नी उषा मित्तल यांच्या नावासंदर्भात विचार सुरु आहे. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये दोन दशकांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महिला अभ्यास केंद्रातील व्हिजिटींग फॅकल्टी पदासाठी तीन नियुक्त्या बाकी असून त्यासंदर्भातच या तिघींच्या नावाचा विचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

आम्ही महिला सशक्तीकरणासंदर्भात संशोधन करतो. आमच्याकडे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे. बीएचयूच्या परंपरेनुसार व्हिजिटींग फॅकल्टी म्हणून समाजसेवा करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा समावेश करण्याच्या उद्देशाने रिलायन्स फाऊण्डेशनच्या निता अंबानी यांना महिला अभ्यास केंद्रामध्ये पाहुण्या प्राचार्या म्हणून येण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. आमच्या महिला अभ्यास केंद्राला त्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा, या हेतूने ही विचारणा करण्यात आलेली. रिलायन्स फाऊण्डेशनने महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रामध्ये बरेच काम केले असल्यामुळेच आम्ही ही विचारणा केली, अशी माहिती सामाजिक शास्त्र विभागाचे प्रमुख असणाऱ्या कौशल किशोर मिश्रा यांनी दिली आहे.

हा निर्णय एखाद्या कटाचा भाग असल्याचे मत या निर्णयाला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक असणाऱ्या शुभम तिवारीने व्यक्त केले आहे. चुकीचे उदाहरण आपण समोर ठेवत आहोत. श्रीमंत व्यक्तीची पत्नी असणे हे काही वैयक्तिक यश नाही. हे लोक आपले आदर्श असू शकत नाहीत. तुम्ही जर महिला सबलिकरणासंदर्भातील आदर्श व्यक्तींना बोलवण्याचा विचार करत असला तर तुम्ही अरुणिमा सिन्हा, भालचंद्री पाल, मेरी कोम आणि किरण बेदींसारख्या व्यक्तींचा विचार केला पाहिजे, असे मत सध्या संशोधन करणाऱ्या शुभमने व्यक्त केले आहे. निती अंबांनीना हे पत्र पाठवल्याची माहिती कुलगुरू भटनागर यांना नसल्याचेही शुभमने म्हटले आहे.