मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती!


मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात मोठी घडामोड घडली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली असून हेमंत नगराळे यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

परमबीरसिंग यांची अखेर मुंबईचे पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. सध्याचे राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी मागील दोन ते तीन दिवसांपासून जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. पण विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी परमबीरसिंग यांची नियुक्त केल्याचे वृत्त आहे. म्हणजे दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये पदांची अदलाबदली झाल्याचे कळते.

1987 च्या बॅचचे हेमंत नगराळे हे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा हेमंत नगराळे यांनी कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना हेमंत नगराळे यांनी देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते.

मार्च 2018 मध्ये नवी मुंबईचे पोलिस आयुक्त असताना हेमंत नगराळे यांचे निलंबन करण्यात आले होते. विधानपरिषदेची परवानगी न घेताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणे नगराळेंना भोवले होते. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हेमंत नगराळे यांनी दिले होते. विधानपरिषदेच्या सभापतींच्या परवानगीविना कोणत्याही आमदारावर गुन्हे दाखल करता येत नसल्यामुळे नगराळेंसह उपायुक्त तुषार दोषी यांना निलंबित करण्याचे निर्देश त्यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले होते.

पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात नगराळेंची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली होती. हेमंत नगराळे यांनी एका बांधकाम व्यावसायिकाला पुरवण्यात आलेले संरक्षण काढून घेतले होते. बिल्डरने या प्रकरणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर नगराळेंना न्यायालयाने झापलेही होते.