केंद्रीय निमलष्करी दलांमध्ये 10 उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची मोठी संधी


नवी दिल्ली : केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी कर्मचारी चयन आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. 25 मार्चला सीमा सुरक्षा बल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF),इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP), सशस्त सीमा बल (SSB),नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी(NIA ) आणि सचिवालय सुरक्षा बल (SSF)आसाम रायफल्समधील भरती प्रक्रियेबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्टला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईल.

स्टाफ सिलेक्शन कमिशनने जाहीर केलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकानुसार जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 10 मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या पदासाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. कॉम्प्युटर आधारित टेस्ट, शारिरीक क्षमता, मेडिकल टेस्ट याच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमदेवार https://ssc.nic.in/SSCFileServer/Portal Management/UploadedFile या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. निमलष्करी दल निहाय अधिकृत नोटिफिकेशन तिथे पाहू शकता.

जीडी कॉन्स्टेबल पदासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून 55915 जागांवर भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये 47582 जागा पुरुष उमेदवारांसाठी तर 8333 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 2018 मध्ये 60210 मध्ये पदांसाठी भरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्याचा निकाल जानेवारी 2021 मध्ये जाहीर झाला होता.

21700-69100 एवढे वेतन जीडी कॉन्स्टेबल पदासाठी दिले जाते. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्याचे वय 18 ते 23 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. सामान्यज्ञान, गणित, हिंदी आणि इंग्रजी, तार्किक क्षमता याविषयी प्रश्न ऑनलाईन परीक्षेमध्ये विचारले जातात. यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये परीक्षा फी आहे. तर, महिला, एससी, एसटी आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही.